15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी; शाळा-कॉलेज आणि कार्यालयांबाबत महत्त्वाची माहिती School College Holidays
राज्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई, पुणे यांसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सरकारने 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, मतदानाच्या दिवशी संबंधित मतदान क्षेत्रातील सरकारी कार्यालये, निमशासकीय विभाग, सार्वजनिक उपक्रम, केंद्र शासनाची कार्यालये तसेच बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्या दिवशी बँकिंग किंवा शासकीय कामकाजाचे नियोजन आधीच करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, निवडणूक क्षेत्रात येणाऱ्या खाजगी आस्थापना, कंपन्या आणि आयटी पार्क्समधील कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी आवश्यक सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे. सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही उद्योग व कामगार विभागाने दिला आहे.
शाळा-कॉलेजांबाबत निर्णय स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार घेण्यात येणार असून, अनेक ठिकाणी शाळा व महाविद्यालयांना त्या दिवशी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. आता सर्वांचे लक्ष 15 जानेवारीच्या मतदानाकडे आणि त्यानंतरच्या स्थानिक राजकीय घडामोडींवर लागले आहे.